लिलावात चक्क ११०० कोटींना विकली गेली ही कार

कधीकाळी हॉलीवूड चित्रपटातून दिसणाऱ्या महागड्या अलिशान गाड्या आता रस्त्यात सुद्धा कुठेही दिसू लागल्या आहेत. महाग कार्सच्या किमती असून असून किती असतील, फार तर १० कोटी,२० कोटी असे जर कुणाला वाटत असेल तर मात्र हा समज त्वरित दूर करायला हवा. जगात आजच्या घडीला महाग म्हणता येईल अश्या कार साठी चक्क ११०० कोटी रुपये मोजले गेले आहेत. मर्सिडीज बेन्झ ३०० एसएलआर Uhlenhaut कुपे ही ती कार असून अत्यंत गुप्तपणे झालेल्या लिलावात तिला एक अज्ञात ग्राहकाने ही किंमत मोजली आहे.

कंपनीने सुद्धा या कारच्या विक्रीची बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला असे समजते. युके मधील एक वेबसाईट हँगर्टी वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार जर्मन कार निर्मात्या, या कंपनीने कारच्या विक्री संदर्भातील चर्चा शक्यतो होऊ नये असा पवित्रा घेतला होता. मर्सिडीज संग्रहालयात ५ मे रोजी हा लिलाव कठोर नियम पाळून केला गेला. यात १० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कार ग्राहकाने त्याचा प्रतीनिधी म्हणून कारतज्ञ किंडस्टन एसएचा प्रमुख सिमोन कीडस्टन याला लिलावात पाठविले होते.

या कारची फक्त दोन मॉडेल बनविली गेली होती. ही रेसिंग कार १९५० च्या दशकात बनविली गेली. त्यावेळी जी दोन मॉडेल बनविली गेली त्यातील ही एक आहे.१९५५ मध्ये या कार्सचे उत्पादन बंद केले गेले. फक्त दोनच मॉडेल असल्याने ही कार खास बनली. या कारचे उत्पादन बंद करण्यासाठी एक अपघात कारणीभूत ठरला होता. १९५४ मध्ये या कारने १२ पैकी ९ रेसेस जिंकल्या पण ११ जून १९५५ मध्ये, लेमन्स रेसमध्ये या कारला झालेल्या अपघातामुळे चालक पिरे लेवेग सह ८३ प्रेक्षक मृत्युमुखी पडले. त्यामुळे पुढची मॉडेल्स तयार केली गेली नाहीत असे समजते.