स्पाइसजेटच्या विमानाचं हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, गोव्याहून येत होते विमान, तपास सुरू


नवी दिल्ली : गोव्याहून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेची माहिती देताना डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरा विमानाच्या केबिनमध्ये धूर दिसल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर विमानातील प्रवाशांना आपत्कालीन एक्झिट गेटमधून बाहेर काढण्यात आले. यादरम्यान एका प्रवाशाच्या पायाला थोडा ओरखडा आला. हैदराबाद विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Q400 विमान VT-SQB मध्ये 80 प्रवासी होते. या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे बुधवारी नऊ विमाने वळवावी लागली. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.

स्पाइसजेट विमान कंपनीला अलीकडच्या काळात ऑपरेशनल अडचणी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे आधीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) देखरेखीखाली आहे. नियामकाने 29 ऑक्टोबरपर्यंत विमान कंपनीला एकूण 50 टक्के उड्डाणे चालवण्याचे निर्देश दिले होते.