या देशांमध्ये ओमिक्रोनच्या एक्सबीबी व्हेरीयंटची दहशत

करोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही हे सांगणारी आणखी एक बातमी आली आहे. चीन पाठोपाठ सिंगापूर मध्ये ओमिक्रोनचे आणखी एक व्हेरीयंट सापडले आहे. यामुळे आशिया मध्ये पुन्हा एकदा करोनाच्या केसेस वेगाने वाढतील अशी शंका वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. सध्या ओमिक्रोनच्या एक्सबीबी वेरीयंटच्या केसेस सिंगापूर, बांग्लादेश आणि हॉंगकॉंग मध्ये वाढत चालल्या आहेत.

फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार सिंगापूर मध्ये गेल्या आठवड्यात करोना व्हेरीयंटच्या ५५०० केसेस रोज येत आहेत. १ महिन्यापूर्वी हाच आकडा दररोज सरासरी दोन हजार केसेस होता. सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग म्हणाले देशात १५ टक्के नागरिकांना करोना संक्रमण झाले आहे. हा आकडा ५० टक्क्यांवर गेला तर करोनाची नवी लाट आल्याचे जाहीर केले जाणार आहे. ओमिक्रोन एक्सबीबी व्हेरीयंट संक्रमण वाढले असून नागरिकांना शेड्युल पूर्वीच तीन दिवस मॉडर्नाचे बुस्टर डोस उपलब्ध केले गेले आहेत. हॉस्पिटल मध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या संक्रमितांच्या संख्येत वाढ असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

बांग्ला देशात सुद्धा संक्रमिताच्या संखेत वाढ झाली असून हे प्रमाण दररोजच्या सरासरी तीनशे वरून ५०० वर गेले आहे. या देशात ७५.५ टक्के लसीकरण झाले आहे. सोमवारी हॉंगकॉंग च्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी एक्सबीबी व्हेरीयंटची पहिली केस आढळल्याचे सांगितले. ते म्हणाले, हा ओमिक्रोनचा उपप्रकार आहे. या व्हेरीयंट मध्ये अँटीबॉडीज ला नुकसान पोहोचविण्याची क्षमता आहे. त्यामुळे मोनोक्लोन अँटीबॉडीज उपचार एक्सबीबी व बीए.२.७५.२ वर कमी प्रभावी ठरतात.