चीनी कारचे दुबईत यशस्वी उड्डाण

फ्लाईंग कार हे आता स्वप्न राहिलेले नाही. नजीकच्या भविष्य काळात अनेक कंपन्या अश्या उडत्या कार्स बाजारात आणतील. चीनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता एक्सपेंग इंकने हवेतून उडणाऱ्या त्यांच्या आकर्षक कारचे दुबईच्या आकाशात प्रथमच सार्वजनिक पातळीवर यशस्वी उड्डाण करून दाखविले. कंपनीच्या वेबसाईटवर एक्सटू या टू सीटर इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग कार संबंधी माहिती दिली गेली आहे.

ही कार आठ प्रोपेलरच्या सहाय्याने हवेत वर उचलली जाते. दुबई नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून विशेष परवाना घेऊन एक्सपेंग एक्स टूचे पहिले सार्वजनिक उड्डाण केले गेले तेव्हा १५० लोक तेथे उपस्थित होते. ही टेस्ट फ्लाईट ९० मिनिटांची होती.  या कार साठी अश्रूच्या थेंबाचा आकार असलेले डिझाईन केले गेले असून वजन कमी व्हावे म्हणून कार्बन फायबर पासून ती बनविली गेली आहे. यातून होणारे कार्बन उत्सर्जन झिरो असल्याचा दावा केला जात आहे.

या कार साठी दोन ड्रायविंग मोड आहेत. एक मॅन्यूअल आणि दुसरा आटोनॉमस. एक बटण दाबून ही कार स्टार्ट होते. एक्स्पेंग एरो एचटी या वर्षीच्या तंत्रज्ञान दिवशी सहाव्या जनरेशनच्या फ्लाईंग कारचे अॅडव्हान्स्ड वर्जन जारी करणार आहे. ही कार आकाशात उडू शकते तशीच जमिनीवर सुद्धा धावू शकते. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने १५ हजार मानवयुक्त उड्डाणे यशस्वी केली आहेत. या कंपनीने अनेक औद्योगिक डिझाईन अॅवॉर्ड आजपर्यंत मिळविली आहेत.