साजिद खानबाबत माझ्या भूमिकेमुळे मला येत आहेत बलात्काराच्या धमक्या, स्वाती मालीवाल यांची तक्रार


नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दावा केला आहे की, सोशल मीडियावर आपल्याला बलात्काराची धमकी दिली जात आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये साजिद खानच्या प्रवेशाला त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे आपल्यासोबत असे घडत असल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

मालिवाल यांनी ट्विट केले की, मी जेव्हापासून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना बिग बॉसमधून साजिद खानला बाहेर काढण्यासाठी पत्र लिहिले आहे, तेव्हापासून मला इन्स्टाग्रामवर बलात्काराची धमकी दिली जात आहे. साहजिकच त्यांना आमचे काम थांबवायचे आहे. मी दिल्ली पोलिसांकडे तक्रार करत आहे. एफआयआर नोंदवून तपास करावा. यामागे कोण आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

केली होती साजिद खानची हकालपट्टी करण्याची मागणी
वास्तविक, स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 16’ मध्ये चित्रपट निर्माता साजिद खानच्या प्रवेशावर चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. आयोगाने सांगितले की, मी-टू चळवळीदरम्यान अनेक महिला पत्रकार आणि अभिनेत्रींनी साजिद खानने केलेल्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवला होता.

साजिद खानवर केले 10 महिलांनी आरोप
यापूर्वी, महिला आयोगाने चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर एका ट्विटमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या 10 महिलांची माहिती दिली होती.

इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने पत्रकार आणि दोन अभिनेत्रींच्या ईमेलवर तक्रारी मिळाल्यानंतर 2019 मध्ये साजिद खानला चित्रपट दिग्दर्शित करण्यापासून निलंबित केले. याशिवाय जेव्हा या तक्रारी समोर आल्या, तेव्हा त्याला ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही काढून टाकण्यात आले.