चीन मध्ये सापडले ओमिक्रोनचे दोन अत्याधिक संक्रमक नवे सबव्हेरीयंट

करोना ओमिक्रोनचे दोन नवे अतिशय वेगाने फैलावणारे सब व्हेरीयंट चीन मध्ये सापडले आहेत. सोमवारी ओमिक्रोनच्या बीएफ .७ व्हेरीयंटचा फैलाव चीनच्या अनेक प्रांतात झाल्याचे समोर आले असून दुसरा सबव्हेरीयंट बीए.५.१.७ प्रथम चीन मधेच आढळला आहे. चीन मध्ये पुढच्या आठवड्यात कमुनिस्ट पार्टीची २० वी राष्ट्रीय परिषद होत असून ती आठवडाभर चालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचा फैलाव झाल्याने नागरिकांच्यात दहशत माजली आहे.

स्थानिक रोग नियंत्रण केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या उत्तर प्रांतांत, शेडोंग मध्ये ४ ऑक्टोबरला बीएफ.७ चा संसर्ग झालेला रुग्ण आढळला. गेला आठवडा चीन मध्ये आठवड्याची राष्ट्रीय सुट्टी होती तरीही रविवारी १८७८ नव्या केसेस सापडल्या. या नव्या व्हेरीयंटवर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे कारण याचा फैलाव अत्याधिक वेगाने होत आहे. ग्लोबल टाईम्सच्या बातमीनुसार अर्थनगरी शांघाई येथे कडक लॉकडाऊन लावला गेला असून नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. करोनाचा रिपोर्ट सकारात्मक आला तर त्या व्यक्तीला त्याच जागी क्वारंटाइन झोन बनवून आयसोलेशन मध्ये ठेवले जात आहे.

चीन मध्ये ओमिक्रोनचा बीए .५.१.७ व्हेरीयंट प्रथमच सापडला आहे मात्र केसेसची संख्या दुप्पट झाली आहे. सततच्या निर्बंधामुळे छोटे व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार याचे मोठे नुकसान होत असल्याचे नागरिक निर्बंध पाळायला तयार नाहीत असे समजते.