सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला अटक करण्यापासून रोखले, ईडीने माणिक भट्टाचार्यला केली अटक


नवी दिल्ली: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कथित सहभागाच्या पार्श्वभूमीवर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) TMC आमदार माणिक भट्टाचार्य यांना आज अटक केली आहे. भट्टाचार्य सोमवारी कोलकाता येथील सीजीओ कॅम्पस येथील ईडी कार्यालयासमोर हजर झाले होते, जेथे शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचवेळी ईडीने आज सकाळी त्यांना अटक केली.

भट्टाचार्य हे नादिया जिल्ह्यातील पलाशीपारा येथील आमदार आणि पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. ईडीच्या टीमने त्यांना सोमवारी या प्रकरणात हजर राहण्यास सांगितले होते, त्यानंतर ते प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आले होते. भट्टाचार्य यांची दुपारी चौकशी करण्यात आली. मात्र, त्याने तपासात सहकार्य केले नाही, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. भट्टाचार्य यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ईडीच्या रडारवर होते माणिक भट्टाचार्य
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी भट्टाचार्य बराच काळ ईडीच्या रडारवर होते, तसेच सीबीआयने त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीसही जारी केली होती. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने टीएमसी आमदाराला चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. सीबीआयने समन्स बजावल्यानंतर, टीएमसी आमदार भट्टाचार्य यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत सीबीआयच्या अटकेतून सूट दिली. त्याचवेळी आता भट्टाचार्य यांना ईडीने अटक केली आहे.

कोण आहेत माणिक भट्टाचार्य?
माणिक भट्टाचार्य हे जोगेश चंद्र चौधरी लॉ कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. जून महिन्यात कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांना राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवले. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण नोंद केलेली मालमत्ता 3 कोटी रुपये आहे, ज्यात 2.3 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 66.4 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचे एकूण घोषित उत्पन्न 24.3 लाख रुपये असून त्यापैकी 21.9 लाख रुपये हे त्यांचे स्वतःचे उत्पन्न आहे.