शिवसेना वादावर कोणतेही भाष्य करु नका, राज ठाकरेंचे नेत्यांना आदेश


मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आहे. दुसरीकडे उद्धव यांच्या पक्षाला ‘ज्वलंत मशाल’ हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये खऱ्या शिवसेनेवरून सुरू असलेल्या युद्धापासून राज ठाकरेंनी स्वतःला दूर ठेवले आहे.

मीडियामध्ये काहीही बोलणे टाळा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या मुद्द्यावर मीडियाशी बोलू नका, असे निर्देश दिले आहेत. यासोबतच या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करू नका, असे आदेशही राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. राज ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत.

2005 मध्ये झाले शिवसेनेपासून वेगळे
2005 मध्ये चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. यानंतर 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली.

शिंदे गट पुन्हा पाठवणार निवडणूक चिन्हांची नवी यादी
एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिंद गटाला अद्याप नवीन निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हांची नवीन यादी पाठवण्यास सांगितले आहे.

यापूर्वी शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून गदा, उगवता सूर्य आणि त्रिशूळ ही नावे सुचवली होती. आता शिंदे गटाला पुन्हा 11 ऑक्टोबरपर्यंत चिन्हासाठी नवीन प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, अखेर बाळासाहेब ठाकरेंच्या भक्कम हिंदुत्व विचारांचा विजय झाला. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. भारतीय निवडणूक आयोगाने आज शिवसेनेच्या शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे.