एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावर आज निर्णय, धार्मिक निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाचा आक्षेप, तीन नवीन पर्याय पाठवण्याचे आदेश


मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेगवेगळी नावे दिली आहेत. आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘ज्वलंत मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यास परवानगी देण्यात आली. एकनाथ शिंदे गटाला अद्याप निवडणूक चिन्ह वाटप झालेले नाही. शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून त्रिशूल किंवा गदा मागितली होती, मात्र आयोगाने धार्मिक चिन्ह देण्यास नकार दिला. आता एकनाथ शिंदे गटाला मंगळवारपर्यंत आणखी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शनिवारी जारी केलेल्या अंतरिम आदेशात ‘शिवसना’ आणि त्याचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य-बाण’ हे नाव गोठवले होते. दोन्ही गटांकडून त्यांच्या पसंतीची नावे व चिन्हे मागविण्यात आली. दोघांनाही सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आपला प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवायचा होता. उद्धव गटाने रविवारी प्रस्ताव पाठवला होता, तर शिंदे गटाने सोमवारी पाठवला होता. त्यानंतर संध्याकाळी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.

शिंदे गटाने सोमवारी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या प्रस्तावात ‘त्रिशूल’, ‘उगवता सुर्य’ आणि गदा निवडणूक चिन्हांची मागणी केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या प्रस्तावात त्यांनी ‘त्रिशूल’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘ज्वलंत मशाल’ चिन्हही मागितले होते. तसेच शिंदे गटाने आपल्या गटासाठी सुचवलेल्या नावांपैकी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि शिवसेना बाळासाहेबांची’ ही तीन नावे मागितली होती. उद्धव गटाने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावे मागितली होती.