दर महिना १,७५,०००लोकांना अमेरिकेत व्हावे लागणार बेकार

अमेरिकेतील महागाईने नागरिक हवालदिल झाले असतानाच आता केंद्रीय बँक, युएस सेन्ट्रल बँकेने फेडरल रिझर्व ज्या प्रकारे व्याजदर वाढ करत आहेत ते पाहता दर महिन्याला १,७५,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली आहे. बँक ऑफ अमेरिकच्या म्हणण्यानुसार या व्याजदरवाढीचा परिणाम पुढच्या वर्षाच्या सुरवातीपासून दिसू लागेल. सप्टेंबर मध्ये अमेरिकन जॉब मार्केट मजबूत वाटले असले तरी लवकरच ही स्थिती पालटेल असे जाणकार सांगत आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक व्याजदर वाढीमुळे लवकरच सर्व वस्तूंची मागणी प्रभावित होईल असे बँक ऑफ अमेरिकेच्या शुक्रवारी सादर झालेल्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. या रिपोर्ट नुसार वर्षाच्या चौथ्या तिमाहीत रोजगार वाढ अर्धी असेल. फेडरल रिझर्व्हने योजलेल्या उपायांमुळे पुढच्या वर्षाच्या सुरवातीला नॉन फार्म सेक्टर मधील नोकऱ्या धोक्यात येतील. त्यामुळे पहिल्या तिमाहीत दर महिन्याला किमान १,७५,००० नोकऱ्या जाऊ शकतात. २०२३ च्या संपूर्ण वर्षात हाच ट्रेंड राहील असाही इशारा दिला गेला आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार बँक ऑफ अमेरिकाच्या युएस अर्थविभाग प्रमुख मायकल गॅपन यांनी पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मंदी जाणवू लागेल. विशेष म्हणजे अमेरिकेत सध्या जॉब मार्केट स्लो असूनही सप्टेंबर मध्ये २,६३,००० कर्मचाऱ्यानी नोकऱ्या सोडल्या आहेत. सध्या ३.५ टक्के असलेला बेरोजगारी दर पुढच्या वर्षात ५ ते ५.५ वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.