उद्धव ठाकरे यांच्या ‘जळत्या मशाली’चे पोस्टर जारी

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जळती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले असून पक्षाचे नाव म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला मान्यता दिली आहे. उद्धव गटाने त्यांच्या निवडणूक चिन्हाचे नवे पोस्टर जारी केले आहे. यामध्ये दोन माणसे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभी आहेत आणि त्या दोघांच्याही  हातात एक  जळती मशाल आहे. पोस्टरचा रंग अग्नीच्या ज्वाळा प्रमाणे भगवा आहे. खाली पांढऱ्या रंगाची एक पट्टी असून त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी अक्षरे आहेत. त्यात एक भगव्या रंगाचा गोल आहे आणि त्यामध्येही एक जळती मशाल दिसते आहे.

शिवसेनेचे माजी प्रवक्ते आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राउत यांनी यावर प्रतिक्रिया देताना हे चिन्ह शिवसेनेसाठी क्रांतीकारी ठरेल असे म्हटले आहे. भविष्यात या चिन्हामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल असेही ते म्हणाले. जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी राउत न्यायालयात आले होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारली होती.

शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे गटाला निवडणुक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना या नावासाठी परवानगी दिली आहे मात्र त्यांनी मागितलेले त्रिशूल आणि गदा ही चिन्हे नाकारली असून नवीन तीन नावांची यादी देण्यास आजची मुदत दिली आहे. ही दोन्ही नावे धार्मिक संदर्भातील असल्याने नाकारली गेल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच उगवता सूर्य या चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केल्याने ते कुणालाच दिले गेलेले नाही असे समजते.