उपलब्ध नसलेल्या चिन्हांची मागणी, ४० डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्य गोठवले- उद्धव ठाकरे

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठविल्याचा निर्णय दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव करून निवडणूक आयोगाकडून ही अपेक्षा नव्हती असे मत व्यक्त केले असून आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे त्यामुळे आपल्याला चिन्ह पुन्हा मिळेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी ‘ ४० डोक्याच्या रावणाने भगवान रामाचे धनुष्य गोठवले याचे वाईट वाटले. मी रागावलोय, त्यांनी आईच्या हृदयात सुरा खुपसला, हिम्मत असेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. मी वडील आणि आजोबांकडून शिकलोय, आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही’ अशी टीका केली.

निवडणूक आयोगाकडे आज दुपारपर्यंत दोन्ही पक्षांनी निवडणूक चिन्ह पर्याय आणि नव्या नावाचे पर्याय द्यायचे आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेत त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्हे मागितली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत मात्र निवडणुक आयोगाने जी चिन्हे उपलब्ध केली आहेत त्यात या चिन्हांचा समावेश नाही. म्हणजे ही चिन्हे सध्या उपलब्ध नाहीत पण तरी खास बाब म्हणून या पैकीच एक चिन्ह मिळावे यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. नावाच्या बाबतीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन नावांवर मतैक्य झाल्याचे सांगितले जात आहे.

 

शिवसेनेला धनुष्य बाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह १ ऑक्टोबर १९८९ साली मिळाले होते. त्यापूर्वी सेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार ढाल, मशाल, कप, उडती तबकडी या चिन्हांवर निवडणुका लढविल्या होत्या असे सांगितले जाते.