ब्रिटीश वैज्ञानिकांनी शोधला दुर्मिळ रक्तगट,’ Er’

माणसाचे काही ठराविक रक्तगट विज्ञानाने सांगितले आहेत. मात्र ब्रिटन मधील वैज्ञानिकांनी एक नवा रक्तगट शोधला असून हा दुर्मिळ रक्तगट आहे. गेली तीस वर्षे यावर संशोधन सुरु होते पण त्याचे कोडे उलगडत नव्हते असे सांगितले जात आहे. हा रक्तगट व त्याचे कंटेंट हैराण करणारे आहेत. गर्भातील बाळासाठी हा रक्तगट जीवघेणा ठरू शकतो असे दिसून आले आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटी आणि नॅशनल हेल्थ सर्व्हे ब्लड अँड ट्रान्सप्लांट अश्या दोन संस्थातील संशोधकांनी मिळून हे संशोधन केले आहे.

मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ हे प्राथमिक रक्तगट आहेत. त्यात बॉम्बे रक्तगटाची भर काही वर्षांपूर्वी पडली होती. आता नव्याने शोधल्या गेलेल्या रक्तगटाला ’ Er’ असे नाव दिले गेले आहे. जर्नल ब्लड रिपोर्ट नुसार गेली तीस वर्षे या रक्तगटाचे कोडे सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या रक्तगटाचे दोन नमुने ब्रिस्टल विद्यापीठात आले होते. या दोघी महिला होत्या आणि दोघीही गरोदर होत्या. पण त्यांच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. या दोघांचाही ब्लड ग्रुप ’ Er’ होता. आई आणि गर्भातील बाळाचा रक्तगट वेगळा असल्याने इम्यून सिस्टीम अनियंत्रित झाली होती.

यात आईच्या ’ Er’ रक्तगटामुळे मुलाच्या रक्तगटाच्या विरुद्ध आईचे शरीर अँटीबॉडिज बनवू लागते. या अँटीबॉडिज गर्भनाळेतून बाळाच्या शरीरात जातात आणि हिमोलिटीक आजार होतो. यात बाळाच्या लाल रक्तपेशींवर आईच्या रक्तपेशी हल्ला करतात आणि त्यात बाळाचा मृत्यू ओढवतो. या नव्या शोधामुळे गर्भातील बाळाचा जीव कसा वाचवायचा यावर संशोधन करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.