महिलांच्या जिद्दीवर बिहार बनले ‘ड्राय स्टेट’, आता जप्त बाटल्यांपासून बनवणार हिरव्या बांगड्या


पाटणा – बिहार अप्रतिम आहे. ही विचाराची आणि कृतीची भूमी असेल तर त्यावर नरसंहारच्या घटनांनी काळे देखील फासले आहे, तर जंगलराजही आहे. गेल्या काही वर्षांत ‘भारत बदलत आहे’, त्यामुळे बिहारही मागे कसा राहील. राज्यात सहा वर्षांपूर्वी महिलांच्या आधारे संपूर्ण दारूबंदी करण्यात आली होती, मात्र आता या काळात जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांचा वापर महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक असलेल्या बांगड्या बनवण्यासाठी करण्यात येणार असल्याची रंजक बातमी समोर आली आहे.

बिहारमध्ये एप्रिल 2016 मध्ये राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. हा प्रकार आजही कायम आहे, कारण अवैध आणि चोरट्या दारू विक्रीची प्रकरणेही समोर येत आहेत. अशा स्थितीत जप्त केलेल्या बाटल्या नष्ट करणे अधिका-यांसाठी मोठी समस्या बनली आहे. ते बुलडोझरने उद्ध्वस्त केले, पण काचेच्या तुकड्यांचे काय करायचे, हे समजत नव्हते.

काही अडचण असेल तर त्यावर उपायही आहे. अखेरीस काचेच्या तुटलेल्या बाटल्यांपासून बांगड्या बनवण्याची कल्पना अधिकाऱ्यांना सुचली. चर्चा सुरू झाली, पुढे पुढे जाऊन कल्पना नियोजन आणि अंमलबजावणीपर्यंत पोहोचली. आता नष्ट झालेल्या बाटल्यांपासून बांगड्या बनवून महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दारूचा महिलांना होतो सर्वाधिक त्रास
दारूमुळे महिलांचे सर्वाधिक नुकसान होते. अनेकदा दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला मारहाण, शिवीगाळ अशा घटना समोर येत असतात. बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांनी दारू आणि दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. बिहार आणि गुजरातमधील दारूबंदीमध्ये महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

युपीमध्ये महिलांना पाठवले बांगड्या बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी
बाटल्यांपासून बांगड्या बनवण्याच्या योजनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलाच त्या बनवतील. बिहारच्या उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभागाने राज्यातील महिलांना बांगड्या बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे पाठवले आहे. या योजनेच्या प्रशिक्षण आणि अंमलबजावणीसाठी सुरुवातीला एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही योजना ‘जीविका’ मिशनच्या रूपाने पुढे नेण्यात येणार आहे.