कुनो अभयारण्यात लवकरच ऐकू येणार बाळ चित्त्याची गुरगुर

नामिबियातून आणलेले आठ चित्ते कुनो अभयारण्यात सोडले गेले त्याला महिना सुद्धा होत नाही तोच येथे बाळ चित्त्याची गुरगुर ऐकू येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे या चित्ता परिवारात लवकरच पिले जन्माला येणार असून २४ ऑक्टोबर नंतर कधीही ही बातमी येऊ शकते असे सांगितले जात आहे. येथे आणल्या गेलेल्या पाच मादा चित्त्यापैकी ‘आशा’ ही मादी प्रेग्नंट असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. तिच्या शरीरात झालेले बदल आता दिसू लागले असल्याने तिला खास देखरेखी खाली ठेवले गेले आहे.

वन्यजीव संस्था डेहराडूनचे डॉ. झाला म्हणाले भारतात आणण्यापूर्वी या मादा चीत्त्याला दीड महिना जास्त देखरेखी खाली ठेवले गेले होते तेथेच तिची गर्भधारणा झाली असावी. चित्त्याचा गर्भकाळ ९३ दिवसांचा असतो. त्यामुळे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरच्या सुरवातीला पिले जन्माला येतील असे वाटते. चित्त्याच्या पिलांचे मृत्यू प्रमाण ९० टक्के आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आशा चित्त्याची सुद्धा विशेष काळजी घेतली जात असून तिला रोज रेड्याचे मटण दिले जात आहे. तिला मोठ्या कुंपणात आणि एकांतात ठेवले गेले आहे. यामुळे तिच्यामध्ये सुरक्षित असल्याची भावना येऊ शकेल. नर चीत्त्यांपासून तिला दूर ठेवण्यात आले आहे.

चित्त्याच्या पिलाचे जन्मजात वजन २५० ग्राम इतकेच असते. १० दिवस त्याचे डोळे उघडत नाहीत. या काळात अन्य वन्य प्राणी म्हणजे तरस, अस्वले, जंगली कुत्री त्यांची शिकार करतात. कुनो मध्ये आणले गेलेले चित्ते १७ ऑक्टोबरला मोठ्या म्हणजे १७ किमी परिसरात सोडले जाणार असून तेथे ते स्वतः शिकार करू शकतील असे सांगितले जात आहे.