दशानन रावणाविषयी काही रोचक माहिती

विजयादशमी म्हणजे दसरा देशभरात नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. दुष्टावर सुष्टाचा विजय म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या सणाकडे पाहिले जाते. भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध केला होता. त्याचे प्रतिक म्हणून दसऱ्याला रावण दहन करण्याची प्रथा आहे. रावणाशी संबंधित अनेक कथा आपल्याला माहिती असतात. रावणाविषयी काही रोचक माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

आपण, राजे रथातून प्रवास करत असत, युद्ध करत असत हे ऐकले आहे. या रथांना घोडे जोडलेले असतात. पण रावणाचा रथाला मात्र घोडे नव्हे तर गाढवे जोडली जात, असे उल्लेख वाल्मिकी रामायणात आहेत. रावणाचे वडील विश्रवा हे ऋषी होते मात्र रावणाची आई कैकसी हे राक्षसी होती. त्यामुळे जेव्हा रावणाचा जन्म झाला तेव्हा त्याचे रूप पाहून वडील घाबरून गेले होते असे उल्लेख आहेत.

या विश्रवा ऋषींचा पहिला विवाह ईडविडा हिच्याशी झाला होता आणि या दोघांचा पुत्र होता देवांचा सावकार कुबेर. म्हणजे कुबेर हा रावणाचा मोठा सावत्र भाऊ होता. रावणाने आपल्या या सावत्र भावाला लंकेतून पळवून लावलेच पण त्याचे पुष्पक विमान सुद्धा त्याच्यापासून बळजबरीने काढून घेतले होते. रंभा अप्सरेने रावणाला असा शाप दिला होता कि जेव्हा कधी तो स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेईल तेव्हा त्याच्या मस्तकाची शकले होतील. म्हणजे मस्तकाचे तुकडे होतील. यामुळेच सीतामाई रावणापासून सुरक्षित राहिली असेही मानले जाते.

रावणाला त्याचा मुलगा मेघनाद याला अजेय बनवायचे होते. त्यासाठी त्याच्या कुंडलीत शनीने योग्य जागेवर राहावे असे आदेश त्याने शनिदेवाला दिले होते. मात्र शनीने ते ऐकले नाही तेव्हा त्याने शनीला बंदी बनविले होते अशी कथा आहे. रावणाच्या सिंहासनाच्या पायात शनीला बंदी करून ठेवले होते असे मानतात.