सचिन वाझेला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका, अँटिलिया प्रकरणात UAPA अंतर्गत चालणार खटला


मुंबई : महाराष्ट्राचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाच्या बाहेर असलेल्या वाहनात बॉम्ब ठेवल्याप्रकरणी वाझे यांच्यावर UAPA अंतर्गत खटला चालवण्यास आव्हान देणारी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

वाझे यांनी अँटिलिया प्रकरणात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यास आव्हान दिले होते. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे.

वाझे यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला मान्य नसल्याचे कारण देत केंद्राने त्याला विरोध केला होता. हे संपूर्ण प्रकरण मुंबईत घडल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. त्याच वेळी याचिकाकर्ते सचिन वाझे यांनी दावा केला होता की हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे, कारण यूएपीए अंतर्गत त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे आणि ते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहे.

वाझे यांनी अधिवक्ता चैतन्य शर्मा यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याच्याविरोधातील दहशतवाद विरोधी कायदा UAPA चे कलम 15(1) रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. हे घटनेच्या कलम 14 (कायद्यासमोर समानता) आणि कलम 21 (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण) चे उल्लंघन असल्याचा दावा केला आहे. वाझे यांनी याचिकेत या कायद्यांतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्याचा केंद्राचा 2 सप्टेंबर 2021 चा आदेश रद्द करून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही पार्किंग आणि व्यापारी हिरेन मनसुख यांच्या हत्येप्रकरणी वाझे यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली होती.

एनआयएने प्रसिद्ध अँटिलिया प्रकरणात वाझे आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या विविध तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर खून, गुन्हेगारी कट, अपहरण आणि स्फोटक पदार्थांचा वापर, UAPA, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन असे आरोप आहेत.

25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलियाच्या बाहेर एका सोडलेल्या वाहनातून स्फोटके जप्त करण्यात आली. हे वाहन चोरीला गेल्याचा दावा व्यापारी हिरेन मनसुख यांनी केला होता. यानंतर गेल्या वर्षी 5 मार्च रोजी मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील नाल्यात मनसुखचा मृतदेह आढळला होता.

या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. या प्रकरणात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर नंतर बेकायदा वसुलीचे आरोप लावण्यात आले. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या बेकायदेशीर वसुलीचा आरोप केला होता. देशमुख आणि वाझे अजूनही तुरुंगात आहेत.