मुंबईत दुकानांबाहेर मराठी फलक न लावणाऱ्यांवर आता बीएमसी करणार कडक कारवाई


मुंबई : मुंबईतील दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर मराठी भाषेतील फलक लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र तरीही अनेक दुकानदारांनी सूचनांचे पालन केलेले नाही. अशा परिस्थितीत ज्या दुकानदारांनी चार मुदतवाढ देऊनही आपल्या आस्थापनांवर किंवा दुकानांवर मराठी भाषेत फलक लावले नाहीत, अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे.

फलक न लावणाऱ्यांवर केली जाईल कायदेशीर कारवाई
उपमहापालिका आयुक्त (विशेष) संजोग काबरे म्हणाले, किती दुकानांनी त्यांच्या दुकानांवर मराठी फलक लावले आहेत, ते आम्ही पाहणार आहोत. जर आम्हाला कोणतेही डिफॉल्टर आढळले, तर आम्ही सात दिवसांच्या आत फलक लावण्याचा इशारा देऊ, जर सूचनांचे पालन त्यांनी केले नाही, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

सूचनांचे पालन न करणाऱ्यांकडून आकारण्यात येणार किती दंड
काबरे पुढे म्हणाले, कायद्यानुसार आम्ही दुकानदाराकडून प्रत्येक कर्मचारी दोन हजार रुपये दंड वसूल करू शकतो. जर कोणी पैसे देण्यास नकार दिला, तर छोट्या न्यायालयात चौकशी अहवाल सादर करून दंड वसूल केला जाईल. ते म्हणाले, मुंबईत सुमारे 5 लाख दुकाने आहेत. आम्ही 2 लाख दुकानांना भेट दिली आणि त्यापैकी सुमारे 1 लाख दुकानांवर मराठी सूचनाफलक लावले आहेत, असे ते म्हणाले.

मार्च 2022 मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी संकेतफलक प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. जर बोर्ड एकापेक्षा जास्त भाषांमध्ये नावे दाखवत असतील, तर मराठी फॉन्ट इतर लिपींपेक्षा लहान नसावा.

त्याच वेळी, दुकानदारांच्या संघटनेने मुंबई महानगरपालिकेला सूचनाफलक बनवण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती केली होती, कारण दुकानांमध्ये फॅन्सी साइनबोर्ड बसवलेले आहेत आणि असे साईनबोर्ड बनवण्यासाठी कलाकार लवकर उपलब्ध होत नाहीत, फॅन्सी साइनबोर्ड बनवणे वेळखाऊपणाचे प्रक्रिया आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिकेने ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.