फेसबुक मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिला जाणार नारळ?

अमेरिकेत आणि युरोप मध्ये मंदी येईल असे संकेत मिळत असताना त्या अगोदरच मंदीचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. अमेरिकेची बलाढ्य टेक कंपनी फेसबुक कर्मचारी कपात करायच्या तयारीत असून १२००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल असे सांगितले जात आहे. रिपोर्ट नुसार फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा १२ हजार कर्मचारी कमी करेल. जाहिरातीतून मिळणारा महसूल कमी झाला असल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. यापूर्वी गुगलने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाई झाल्याने नवी भरती कमी केली असून कर्मचारी भत्ते सुद्धा कमी केले आहेत.

बिझिनेस इनसाईडरच्या रिपोर्ट नुसार मार्क झुकेरबर्ग याने कर्मचाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत कपातीचे संकेत दिले आहेत. व्यवस्थापनातील सर्व टीम लीडर्सना, प्रत्येकाने टीम मधून किमान १५ टक्के कर्मचाऱ्यांची नावे द्यायची असून ज्यांचे काम समाधानकारक नाही त्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल. मेटा मधील एका कर्मचाऱ्याने ही माहिती ब्लाईंड अॅपवर दिली असून हे अॅप टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. परिणामी येत्या काही आठवड्यात अनेकांना नारळ मिळतील असे समजते. राजीनामा देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे.

पुढच्या वर्षात कर्मचारी भरती कमी केली तर कंपनीचा वर्षाचा खर्च ३ अब्ज डॉलर्स कमी होणार असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये नमूद केले गेले आहे. त्यानुसार मेटा १० टक्के खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करत असून सर्व विभागाची पुनर्रचना केली जात आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे शक्य होणार आहे.