जगातील सर्वात महागडे घड्याळ, किंमत ४११ कोटी रुपये

दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुबई वरून आलेल्या एका तस्कराकडून अतिशय महागडी अशी सात घड्याळे जप्त केली असून त्यातील जेकब कंपनीचे एक घड्याळ २७.०९ कोटी रुपये किमतीचे असल्याचे समजते. अन्य सहा घड्याळे सुद्धा अशीच महागडी असून या सर्व घड्याळांची किंमत ६० किलो सोन्याइतकी आहे. २७ कोटींचे घड्याळ म्हणजे काय असेल असा प्रश्न कुणालाही पडेल. पण हे घड्याळ जगातील सर्वाधिक महाग घड्याळ नाही. सर्वाधिक महाग घड्याळाची किंमत ५.५० कोटी डॉलर्स म्हणजे तब्बल ४११ कोटी रुपये आहे. ग्राफ डायमंड हॅल्युसीनेशन असे त्याचे नाव आहे.

या घड्याळावर ११० कॅरटचे रंगीत आणि दुर्मिळ हिरे जडविले गेले आहेत. कोणत्याही घड्याळाची किंमत ठरविताना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. मटेरीयल कोणते, वस्तू बनविण्यासाठी लागलेला वेळ, किती कुशल कामगार लागले, कलाकुसर कशी आहे, संबंधित वस्तूचे किती नग बनविले गेले अश्या अनेक बाबी विचारात घेतल्या जातात.

डायमंड हॅल्युसीनेशन, प्रथम, २०१४ मध्ये बेसलवर्ल्ड मध्ये सादर केले गेले. जवळून निरखून पाहिले तर ते घड्याळ आहे हे कळते अन्यथा ते रत्नजडीत ब्रेसलेट वाटते. या ब्रेसलेट घड्याळासाठी प्लॅटीनमचा वापर केला गेला आहे. पण विविध आकाराचे आणि विविध रंगांचे हिरे त्यावर असे जडविले गेले आहेत की खाली प्लॅटीनम आहे हे दिसत सुद्धा नाही. पिवळे,हिरवट, निळे, केशरी, ग्रे अश्या विविध रंगांचे मौल्यवान हिरे यात जडविले आहेत. गुलाबी हिऱ्यापासून घड्याळाची डायल बनविली गेली आहे. हा नमुना घडविण्यासाठी हजारो तास अनेक कुशल कारागीर खपले आहेत. विशेष म्हणजे हे लेडीज घड्याळ आहे.