रिलायन्स हॉस्पिटल उडवण्याची आणि अंबानी कुटुंबीयांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक


मुंबई : मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि अंबानी कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे.

धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दरभंगा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला मुंबईत आणले जात आहे. रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, बुधवारी दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कॉल सेंटरला कॉल करून धमकी मिळाली. आरोपींनी लँडलाइन फोन नंबरवर हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची आणि मुकेश, नीता, आकाश आणि अनंत अंबानी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती.

रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर हा धमकीचा कॉल आला, त्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 12:57 वाजता एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. धमक्या देणाऱ्या व्यक्तीने अंबानी कुटुंबाच्या नावाने धमक्याही दिल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या वर्षी ऑगस्टमध्ये एका ज्वेलर्सला रुग्णालयात बोलावून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये, अंबानींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान ‘अँटिलिया’ जवळ स्फोटकांनी भरलेले स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सापडले होते. त्यानंतर या घटनेप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली होती.