मोदींनी शूट केलेला कुल्लूचा व्हिडीओ वेगाने व्हायरल

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केलेल्या हिमाचल प्रदेश दौऱ्यात बिलासपुर कुल्लू मार्गावर हेलीकॉप्टरमधून शूट केलेला २१ सेकंदाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता मोदींनी हा व्हीडीओ त्यांच्या फेसबुक अकौंटवर शेअर केला आणि अवघ्या १५ तासात म्हणजे गुरुवारी सकाळी ६ पर्यंत हा व्हिडीओ ३१ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेल्याचे समजते. या व्हिडीओला २.४७ लाख लाईक मिळाले आणि ७८०० युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला.

बुधवारी पंतप्रधान मोदींनी बिलासपूर येथे एम्स आणि अन्य काही प्रोजेक्टचे उद्घाटन केले आणि सभा घेऊन ते हेलिकॉप्टर ने कुल्लुच्या थुन्तर विमानतळाकडे जात असतांना त्यांनी कुल्लूचे नैसर्गिक सौंदर्य या व्हिडीओमध्ये चित्रित केले. या व्हिडीओ मध्ये आसपासचे उंच सुंदर पहाड,हिरवळ इतकेच काय पण पंतप्रधान मोदींच्या हेलीकॉप्टरची सावली सुद्धा दिसते आहे. कुल्लू येथील आंतरराष्ट्रीय दसरा मेळाव्यात मोदी सहभागी झाले आणि त्यांनी रघुनाथ रथयात्रेत सुद्धा भाग घेतला. कुल्लुच्या या प्रसिद्ध दसरा महोत्सवात सामील होणारे मोदी हे भारताचे पाहिले पंतप्रधान आहेत.

मोदी नेहमीच हिमाचल प्रदेश हे आपले दुसरे घर आहे असे सांगतात. गुजराथचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी भाजप संघटना विकासासाठी हिमाचल मध्ये खूप काम केले आहे. कित्येक दिवस येथे राहून त्यांनी पक्षाचे काम केल्याचे सांगितले जाते.