‘भारत जोडो’ यात्रेत आज सामील होणार सोनिया गांधी

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी कर्नाटक राज्यातील मंड्या येथे दाखल झाल्या असून त्या येथून राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी सुरु केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी सोनिया मैसूर येथे आल्या होत्या. गेले काही दिवस त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे त्या थोडाच वेळ यात्रेत सामील होणार असून काही अंतर पायी जाणार आहेत.

या निमित्ताने दीर्घकाळानंतर सोनिया गांधी कॉंग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कर्नाटक आणि दक्षिणेतील राज्यांशी गांधी कुटुंबाचे विशेष संबंध आहेत. जेव्हा जेव्हा गांधी कुटुंब अडचणीत आले, तेव्हा दक्षिणेकडील राज्यांनीच त्यांना मदतीचा हात दिला आहे. इंदिरा गांधी यांनी सुद्धा आणीबाणी नंतर कॉंग्रेस अगदी दुबळी झाली असताना कर्नाटकातील चिकमंगळूर येथून निवडणूक लढवून विजय आणि सत्ता परत मिळवली होती.

सोनिया गांधी यांनी सुद्धा अमेठीचा मतदारसंघ त्यांच्या साठी सुरक्षित राहिला नाही तेव्हा कर्नाटकातील बेल्लारी येथून निवडणूक लढविली होती. त्यांची ही उमेदवारी गुप्त ठेवण्याचे प्रयत्न झाले होते मात्र भाजपला त्याचा सुगावा लागताच सुषमा स्वराज यांना या मतदारसंघातून भाजपने सोनिया गांधींच्या विरोधात उभे केले होते. तेव्हा सुषमा स्वराज यांना पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधी यांनी सुद्धा अमेठी मधून निवडणूक हरण्याची शक्यता लक्षात येताच केरलच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरून विजय मिळविला होता.