किंग चार्ल्स कडून प्रिन्स विलियम घेणार ७ लाख पौड घरभाडे

ब्रिटनचे नवनियुक्त किंग चार्ल्स थ्री यांचा मोठा मुलगा प्रिन्स विलियम, वडिलांचे आवडते घर हायग्रोवचे भाडे राजाकडून घेणार आहे. चार्ल्स राजे बनल्याने आता त्यांचे अधिकृत निवासस्थान बकिंगहम पॅलेस आहे. पण किंग चार्ल्स तेथे राहण्यास उत्सुक नाहीत. त्या ऐवजी ते त्यांच्या आवडत्या हायग्रोव्ह येथील घरात राहतील. चार्ल्स राजे बनल्यामुळे आता प्रिन्स विलियम डची शासक बनले आहेत. ही सर्व मालमता ब्रिटीश राजघराण्याच्या परंपरेनुसार मोठ्या मुलाला दिली जाते. त्याप्रमाणे आता याच भागात येणाऱ्या हायग्रोव्ह घराची मालकी विलियम यांच्याकडे आली आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार प्रिन्स विलियम सध्या डच ऑफ कॉर्नवॉल आहेत. ४० वर्षीय विलियम परंपरेने त्यांना मिळालेली डची मालमत्ता वैयक्तिक लाभासाठी विकू शकत नाहीत. त्यामुळे हाय ग्रोव येथील घरात राहण्यासाठी ते वडिलांकडून वर्षाला ७ लाख पौड भाडे घेणार आहेत. त्यांना किंग चार्ल्स कडून ३८ कोटी अमेरिकी डॉलर्सची संपत्ती मिळाल्याने ते आता या संपत्तीचे जमीनदार बनले आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी हे घर १९८० मध्ये खरेदी केले होते आणि त्याची अंतर्गत सजावट प्रिन्सेस डायना यांनी केली होती असे समजते. या मालमत्तेत एकूण १२८००० एकर जमीन आहे. गतवर्षी यातून २१ दशलक्ष पौड कमाई झाली होती.

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर चार्ल्स राजे बनले आहेत आणि प्रिन्स विलियम त्यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. डची ऑफ कॉर्निवोल ही संपत्ती त्यांना विरासत म्हणून मिळाली असून यात इंग्लंड आणि वेल्श मधील २० कौंटी जमीन येते. यातच हायग्रोव येथील घर आहे.