पीएफआय मध्ये अशी होती भरती प्रक्रिया, लग्न करण्यास नाही परवानगी

भारतात नुकतीच बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची पाळेमुळे किती खोलवर गेली होती हे त्यांच्या सदस्य संख्येवरून समोर आले आहे. या संघटनेचे देशभरात २ लाखाहून अधिक सदस्य सक्रिय आहेत असे गुप्तचर यंत्रणा अधिकारी सांगतात. या अधिकाऱ्यांनी पीएफआयच्या मुख्य ठिकाणांवर घातलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आल्याचे समजते.

या संघटनेने राज्य पातळीवर ग्रामीण भागात अनेक समित्या स्थापन केल्या असून त्यातून संघटनेची सदस्य भरती केली जाते. सदस्य भरतीचे चार टप्पे आहेत. त्यात प्रशिक्षण, ब्रेनवॉश, कायदेशीर डावपेच खेळणे याच्या समावेश असून त्यासाठी वेगवेगळे केडर आहेत. प्रत्येक केडर साठी वेगळा पगार आणि सवलती दिल्या जातात. त्यात औषधोपचारापासून रोजच्या घरगुती खर्चाची काळजी घेतली जाते. अन्य राज्यात किंवा बाहेर पाठविले गेले तर वेगळा खर्च दिला जातो. समजा कुणी सदस्य पकडला गेला तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा वकिलांचा खर्च दिला जातो.

यात स्थायी सदस्य दर्जा मिळविण्यासाठी तीन पातळ्यांवर प्रशिक्षण घ्यावे लागते. सदस्याला त्यांच्या गावापासून बाहेर अन्य राज्यात काम करावे लागते आणि त्यांना विवाह करण्याची परवानगी नाही. महिलांचा विंग वेगळा आहे. सदस्यावर तो राहत असलेल्या ठिकाणी आसपासच्या १५ घरातून पीएफआय साठी समर्थक बनविण्याची जबाबदारी दिली जाते. त्या लोकांची विचारधारा बदलायची आणि इस्लाम विषयातला कुठलाही विवाद झाला तर रस्त्यावर उतरून निदर्शने करणे, दंगे करणे अशी कामे यात येतात. सदस्य म्हणून निवड झाल्यावर पहिले चार महिने त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि त्यांच्या खानदानाचा सर्व इतिहास तयार केला जातो. यात सदस्य पास झाला कि तो पहिल्या पातळीचा सदस्य बनतो.

मुस्लीम बहुल भागात शाखा घेणे, लोकांना औषधे, अन्न पुरवठा करणे असे काम हे सदस्य करतात, स्टेज दोन मध्ये सहा महिने असे काम करून आपण विश्वासपात्र आहोत हे शाबित केले की त्याला कट्टरपंथी मानले जाते. मग त्याने सोशल मिडीयावर मेसेजेस प्रसारित करणे, पोलिसांशी निपटणे अशी कामे करायची असतात. त्यासाठी वेगळे प्रशिक्षण दिले जाते. स्टेज तीन मध्ये घर जिल्हा सोडून अन्य जागी काम करावे लागते. येथून पगार आणि भत्ते सुरु होतात. गणवेश मिळतो आणि तीन महिने प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ मध्ये पाठविले जाते. हा सर्व खर्च संघटना करते. स्टेज चार मध्ये संघटना विस्तार प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय लिंक्स तयार करणे, स्टेज १ व २ साठी ट्रेनर तयार करणे अशी कामे असतात. स्टेज ३ मध्ये फक्त ५ टक्के सदस्यांना प्रवेश मिळतो आणि संघटनेसाठी फंड गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.