माधुरी दीक्षितने खरेदी केले 48 कोटींचे सुपर लक्झरी अपार्टमेंट, भरले 2.4 कोटी मुद्रांक शुल्क


बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी भागात 48 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. 53व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटमधून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचे विहंगम दृश्य दिसते. माधुरीने हे लक्झरी अपार्टमेंट वरळीच्या डॉ. ई मोसेस रोडवरील इंडियाबुल्स ब्लू या सुपर प्रीमियम निवासी प्रकल्पात घेतले आहे. सुमारे 90,000 रुपयांना एका चौरस फुटावर हा व्यवहार झाला आहे. हे या वर्षातील सर्वात महागड्या सौद्यांपैकी एक आहे. माधुरीचे अपार्टमेंट टॉवर सी मध्ये 53व्या मजल्यावर आहे आणि ते 5,384 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांनी इंडियाबुल्स ब्लूमध्ये अपार्टमेंट्सही खरेदी केले आहेत. 10 एकरमध्ये पसरलेल्या या आलिशान निवासी प्रकल्पाचे 100 कोटी रुपयांपर्यंतचे सौदे झाले आहेत. माधुरीच्या लक्झरी अपार्टमेंटची 28 सप्टेंबर रोजी नोंदणी झाली आणि तिने त्यावर 2.4 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट मिळते. सार्वजनिकरित्या उपलब्ध नोंदणी डेटा ट्रॅकिंग वेबसाइट zepkey.com द्वारे सापडलेल्या कागदपत्रांनुसार या अपार्टमेंटसह, माधुरीला सात कारसाठी पार्किंग स्लॉट देण्यात आला आहे.

भाडेतत्त्वावर घेतले होते अपार्टमेंट
माधुरीने गेल्या वर्षी याच प्रकल्पात 29व्या मजल्यावर 5,500 स्क्वेअर फूट पसरलेले एक अपार्टमेंट लीजवर घेतले होते. हे अपार्टमेंट 36 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. दीक्षित-नेने कुटुंबीयांनी या अपार्टमेंटच्या आतील बाजूचे कामही सुरू केले होते. या सदनिकेचे भाडेपट्टे सुरू राहणार की रद्द करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत दीक्षित-नेने कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही.

गेल्या महिन्यात, अमित बक्षी, फार्मास्युटिकल कंपनी एरिस लाइफसायन्सेसचे अध्यक्ष आणि एमडी यांनी वरळीच्या 3 सिक्स्टी वेस्ट प्रकल्पात 61 कोटी रुपयांचे अपार्टमेंट विकत घेतले होते. 30 व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचा सौदा 94,500 रुपये प्रति चौरस फूट दराने झाला होता. महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये मुंबईत मुद्रांक शुल्कात सूट दिली होती. ही सूट 31 मार्च 2021 पर्यंत देण्यात आली होती. या काळात शहरातील मालमत्तांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.