Nobel Prize 2022 : भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना जाहीर


नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. याच क्रमाने मंगळवारी (4 ऑक्टोबर) भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना 2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘क्वांटम मेकॅनिक्स’ या क्षेत्रातील कार्यासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नोबेल पारितोषिकाची घोषणा सोमवारी (3 ऑक्टोबर) स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना त्यांच्या निअँडरथल डीएनएवरील शोधांसाठी वैद्यकशास्त्रातील पारितोषिक देऊन सुरू झाली. पाबो यांनी आधुनिक मानव आणि विलुप्त प्रजातींच्या जीनोमची तुलना करून हे दाखवून दिले की दोघांमध्ये परस्पर मिश्रण आहे.


नोबेल पुरस्काराची घोषणा
या आठवड्यात बुधवारी रसायनशास्त्राचे नोबेल आणि गुरुवारी साहित्याचे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी तर अर्थशास्त्राचा पुरस्कार 10 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

2021 मध्येही तीन शास्त्रज्ञांना मिळाला होता हा पुरस्कार
भौतिकशास्त्रासाठी, 2021 मध्ये, तीन शास्त्रज्ञ – स्युकुरो मानेबे, क्लॉस हसेलमन आणि ज्योर्जिओ पॅरिसी यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. निसर्गातील जटिल शक्ती समजून घेण्यासाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या शोधामुळे हवामानातील बदल समजण्यास मदत झाली.