राज्यात सुरु करणार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने 700 आरोग्य केंद्र, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार राज्यात 700 आरोग्य केंद्र उघडणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिंदे सरकार सुरू करत असलेल्या या आरोग्य केंद्रांना आपला दवाखाना असे संबोधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचे 700 हेल्थ क्लिनिक लवकरच जनतेसाठी खुले केले जाणार आहेत.

आपला दवाखान्याबाबत निवेदन देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करणे, याला त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य बजेट दुप्पट केले जाईल. आपला दवाखाना उपक्रमामागील उद्देश लोकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. राज्यात असे सुमारे 700 दवाखाने उघडले जातील आणि एकट्या मुंबईत अशा सुविधा 227 ठिकाणी उपलब्ध असतील. 2 ऑक्टोबर रोजी त्यापैकी 50 सुरु करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात उघडणार वैद्यकीय महाविद्यालय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगले उपचार मिळू शकणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिल्हा स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालये ग्रामीण भागात पुरेसे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी मिळतील याची काळजी घेतील. तसेच राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, उप-रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये यांची वर्गवारी केली जाईल. त्याच वेळी, सरकार राज्यात कॅथेटेरायझेशन प्रयोगशाळा देखील उघडणार आहे.