हेमाम्बिका मंदिर, येथूनच इंदिराजींना ‘हात’ चिन्ह घेण्याची मिळाली होती प्रेरणा

केरळ मधील चार प्रमुख अंबिका मंदिरातील एक हेमाम्बिका मंदिर अन्य मंदिरांच्या तुलनेत थोडे लहान जरूर आहे पण या मंदिराचा इतिहास फार मोठा आहे. केरळच्या पडक्कल जिल्ह्यातील भगवान परशुरामाने स्थापलेले हे मंदिर कॉंग्रेसशी संबंधित आहे. या मंदिरात मातेची मूर्ती नाही. तर दोन हातांची पूजा येथे केली जाते.

सध्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे आणि ती केरळ पासून सुरु झाली आहे. चार दशकांपूर्वी केरळ मधूनच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही कॉंग्रेस मध्ये नवीन प्राण फुंकले होते. त्यावेळी येथे कॉंग्रेस दोन तुकड्यात विभाजित झाली होती आणि या दोन्ही कॉंग्रेस मध्ये एकजूट करण्यासाठी इंदिराजी येथे आल्या होत्या. त्यावेळी कॉंग्रेसचे गायवासरू हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते आणि नवीन चिन्हासाठी हाताचा पंजा, हत्त्ती आणि आणखी काही चिन्हे मागितली गेली होती.

असे सांगतात की त्यावेळी इंदिरा गांधी यांनी तत्कालीन नेते करुणाकरण यांच्या सह या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराला इमुर भगवती मंदिर असेही म्हणतात. १९८० मध्ये इंदिरा गांधी येथे आल्या तेव्हा सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश कैलासम आणि त्यांच्या पत्नी सौंदर्या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. सौंदर्या यांनी इंदिराजीना या मंदिराचा महिमा सांगितला आणि नवे निवडणूक चिन्ह म्हणून पंजाची निवड करण्याचा सल्ला दिला असे सांगतात. त्यानंतर इंदिराजींनी पंजा हेच चिन्ह निश्चित केले.

निवडणुकीत विजय मिळवून इंदिराजी पुन्हा १९८२ मध्ये या मंदिरात आल्या आणि त्यांनी ५००१ रुपये आणि तांब्याची घंटा दान केली. त्यांना मलबार देवस्थानम तर्फे आणि राजपरिवारतर्फे एक लॉकेट दिले गेले त्यावर मंदिरातील मूर्तीचे प्रतिक म्हणजे हाताचे पंजे होते. हे मंदिर १५०० वर्षे जुने असून आजही राजाचा राज्याभिषेक येथेच होतो. अंबीकलयम समूहात अशी चार मंदिरे असून त्यातील मुकाम्बिका मंदिर उडपी येथे आहे. लोकाम्बिका मंदिर कोन्दुगालूर येथे तर बलाम्बिका मंदिर कन्याकुमारी येथे आहे.