पुतीन यांचे घातकी फ्रॉगमन कमांडो पथक

रशिया युरोप यांच्यामधील नैसर्गिक वायू वाहून नेणारी पाईपलाईन ‘नॉर्ड स्ट्रीम’ बाल्टिक समुद्रात फुटल्यानंतर अचानक रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे घातकी फ्रॉगमन कमांडो पथक चर्चेत आले आहे. युक्रेन युद्धामुळे या भागात तणाव वाढला आहे आणि रशियाने युरोप विरुद्ध उर्जा युद्ध सुरु केल्याचा संकेत म्हणून या प्रकाराकडे पाहिले जात आहे. या पाईपलाईनवर फ्रॉग कमांडोनीच हल्ला केला असल्याचे दावे केले जात आहेत. नॉर्ड स्ट्रीम ही युरोपची लाईफलाईन समजली जाते. येथील गॅस पुरवठा बाधित झाला तर आगामी हिवाळा युरोपसाठी मोठा खडतर ठरणार आहे.

फ्रॉगमन हे स्पेशल कमांडो असून रशियन नौसेना आणि पुतीन यांच्यासाठी ते हेर म्हणून सुद्धा काम करतात. वरील पाईपलाईन वर हल्ला करण्यासाठी ड्रोन सबमरीन, पाणबुडे वापरले गेले असावेत असा संशय आहे. हे कमांडो शस्त्रसज्ज आणि उच्च प्रशिक्षित आणि अतिशय घातक, धोकादायक आहेत. काळे स्विम सूट, अंडरवॉटर गन्स वापरणारे हे कमांडो खोल पाण्यात सुद्धा स्पेशल मोहीम राबविण्यास सक्षम आहेत. हेरगिरी आणि हल्ले दोन्हीचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. छोट्या पाणबुड्या, टोर्पेडो,स्पेशल शस्त्रे,स्पीड बोट आणि प्रशिक्षित डॉल्फिन मासे असा हा ग्रुप आहे.

पाण्याखाली गुप्त कारवाया करणारे पुतीन यांचे हे कमांडो गुगी नौसैनिक संस्थेसाठी काम करतात. ही संस्था खोल पाण्यात संशोधन करते. वास्तविक हा एक गुप्तहेर विभागच आहे. हे कमांडो त्यांच्या खास गन्सने पाण्यातच फायर करू शकतात. ४.७५ इंची स्टील बोल्ट यातून फायर केले जातात. सामान्य बंदुकीच्या गोळीपेक्षा हे अधिक घातक आहे आणि जास्त नुकसान करते. याच बरोबर या कमांडोना एसएसपी-१ पिस्तुल सुद्धा दिली जातात. अर्थात ही दोन्ही शस्त्रे जमिनीवर फारशी उपयुक्त नाहीत पण पाण्यात फारच विनाशकारी आहेत. या कमांडोना पाण्यात शस्त्र चालले नाही तर ब्लेडचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते.