नामिबियातील चित्त्यांमुळे आला लंपी व्हायरस –नाना पटोले

महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी लंपी व्हायरस बद्दल अजब विधान केले असून हा व्हायरस फार पूर्वीपासून नामिबिया मध्ये होता आणि नामिबियातील चित्ते भारतात आणले गेल्यामुळेच या रोगाचा भारतात प्रसार झाल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकारने मुद्दामच शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे यासाठी नामिबिया मधून चित्ते भारतात आणण्याची व्यवस्था केली . पटोले म्हणाले चित्त्यांच्या अंगावर ज्या प्रमाणे ठिपके आहेत, लंपीची लागण झालेल्या गाईंच्या अंगावर सुद्धा तसेच ठिपके येत आहेत. अनेक वर्षांपासून नामिबिया मध्ये हा रोग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी येथून आणलेले आठ चित्ते कुनो अभयारण्यात सोडले आहेत.

लंपीची प्रथम लागण देशात राजस्थान, गुजराथ पासून झाली असून आता हा रोग पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यात फैलावला आहे. अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरे या रोगाला बळी पडली आहेत. सध्या पशूना या व्हायरस पासून संरक्षण मिळावे म्हणून ‘गोट पॉक्स’ लस दिली जात आहे. पशु वैद्यकांच्या म्हणण्यानुसार किडे, डास त्यांच्या द्वारे हा रोग पसरतो. महाराष्ट्रात शेकडो जनावरे या रोगात मृत्युमुखी पडली आहेत. गेले काही आठवडे नाशिक, नंदुरबार,जळगाव, धुळे, अहमदनगर येथे या विषाणूने उच्छाद मांडला असून सुमारे २५० जनावरे मरण पावली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार काही होमिओपॅथिक औषधे दिल्याने रोग झालेली जनावरे १० ते १५ दिवसात बरी होत आहेत.