आरएसएसने गरिबीचे ‘राक्षसी’ आव्हान असे केले वर्णन, उत्पन्नातील असमानता आणि बेरोजगारीबद्दल व्यक्त केली चिंता


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) सोमवारी (3 ऑक्टोबर) देशातील गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, गरिबी हे राक्षसासारखे आव्हान आहे. गरिबीकडे लक्ष देताना ते म्हणाले की सुमारे 200 दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. या परिस्थितीचे खापर त्यांनी गेल्या अनेक दशकांतील आर्थिक धोरणांवर फोडले.

आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत या आव्हानाचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

गरिबी ‘राक्षस’ सारखे आव्हान- RSS
स्वदेशी जागरण मंचने स्वबलंबी भारत अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, अनेक क्षेत्रात प्रगती होत असूनही अजूनही काही क्षेत्रे अशी आहेत, जिथे देशासमोर आव्हाने आहेत. ते म्हणाले की, गरिबी हे आपल्यासमोर राक्षसासारखे आव्हान आहे. गरिबीच्या राक्षसाला मारणे आपल्यासाठी आवश्यक आहे. 200 दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. एका आकडेवारीचा हवाला देत ते म्हणाले की 23 कोटींहून अधिक लोकांचे उत्पन्न दररोज 275 रुपयांपेक्षा कमी आहे.

बेरोजगारीबद्दल व्यक्त केली चिंता
दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, देशात चार कोटी बेरोजगार आहेत. श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, आमच्याकडे बेरोजगारीचा दर 7.6% आहे. नोकऱ्यांचा अभाव, योग्य शिक्षण, निकृष्ट पोषण आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि पर्यावरणीय समस्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीचा हवाला दिला. हवामान बदल हे गरिबीचे एक कारण असून अनेक ठिकाणी सरकारची अकार्यक्षमता गरिबीला कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी पुरवठादार होण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

नितीन गडकरी यांनीही व्यक्त केली होती चिंता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (29 सप्टेंबर) सांगितले की, भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असला, तरी मोठ्या संख्येने लोक गरिबीने त्रस्त आहेत. ते म्हणाले होते की, देशातील मोठ्या लोकसंख्येला भूक, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाई यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात गरीब आणि श्रीमंत ही दरी रुंदावत चालली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. आरएसएस प्रणित संघटना भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.