T-20 World Cup 2022 : राहुल द्रविडने ट्रेनिंगसाठी बनवला खास प्लान, चेतनसह तीन वेगवान गोलंदाज जाणार ऑस्ट्रेलियाला


ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेला 20 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. मात्र, बुमराह वर्ल्ड कपपर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर प्रशिक्षक राहुल द्रविडने बॅकअप प्लॅन तयार केला आहे. T20 विश्वचषकासाठी, तीन वेगवान गोलंदाज कुलदीप सेन, चेतन साकारिया आणि मुकेश चौधरी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारताने आपल्या राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहर, श्रेयस अय्यर यांना स्थान दिले होते. पण या दोन्ही खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड झाली आहे. म्हणजेच हे दोन्ही खेळाडू नंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

विश्वचषकासाठी ज्या 15 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे, ते 15 खेळाडू 6 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. याशिवाय मोहम्मद शमी आणि उमरान मलिक यांनाही ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार आहे.

द्रविडने आखला खास प्लान
इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडनेही प्रशिक्षण सत्राबाबत विशेष योजना बनवली आहे. चेतन आणि मुकेश हे डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत आणि सराव सत्रात हे दोघेही टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असतील. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप सेनलाही 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार आहे.

याशिवाय जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अजूनही वेट अँड वॉचच्या स्थितीत आहे. बुमराह तंदुरुस्त व्हावा अशी बोर्डाची अपेक्षा आहे. बुमराह तंदुरुस्त नसल्यास त्याच्या जागी मोहम्मद शमी 15 सदस्यीय संघात स्थान घेऊ शकतो. शमीशिवाय बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजही शर्यतीत आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआय याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते.