एम्समध्ये ओपीडी फॉर्म घेण्यासाठी नोव्हेंबरपासून कोणतेही शुल्क नाही, 300 रुपयांपर्यंत मोफत तपासणी


नवी दिल्ली : ज्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये उपचार करून घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी उपयुक्त आहे. लवकरच एम्सच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर स्लॉट पद्धतीने उपचार केले जातील. यामध्ये ज्या रुग्णांचा नंबर येणार नाही, त्यांना वेटिंग एरियात थांबावे लागणार असून अशा सर्व रुग्णांना टोकन दिले जाणार आहे. प्रतीक्षा असलेल्या रुग्णांमध्ये गर्भवती, दिव्यांग, वृद्ध आणि गरजूंना प्राधान्य दिले जाईल.

एम्सचे संचालक डॉ.एम.श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपीडीमधील गर्दीवर नियंत्रण आणि उपचार पद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राजकुमारी अमृत कौर ओपीडी आणि सर्जिकल ब्लॉकच्या ओपीडीमध्ये स्लॉटनुसार ऑनलाइन अपॉइंटमेंट दिली जाईल. अपॉइंटमेंट स्लिपवर उपलब्ध वेळेनुसार, रुग्णांना ओपीडीमध्ये दाखवता येईल. याशिवाय ऑनलाइन अपॉईंटमेंटशिवाय ओपीडीमध्ये उपचारासाठी पोहोचणाऱ्या रुग्णांना स्लॉटही दिला जाणार आहे. अशा रुग्णांना वेळ येईपर्यंत वेटिंग एरियात थांबावे लागणार आहे. प्रतीक्षालयात रुग्णांसाठी विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांना त्यांच्या क्रमांकाचीही माहिती येथे मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्समध्ये उपचारासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट देण्याचे काम आजपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर 1 नोव्हेंबरपासून स्लॉटनुसार मिळालेल्या अपॉइंटमेंटवर ओपीडीमध्ये रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा सुरू होणार आहे. एम्सच्या ओपीडीमध्ये नोंदणीसाठी सकाळपासूनच रांगा लागतात. ते कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हजारो लोकांना मिळणार लाभ
एम्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आता 300 रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. त्याचबरोबर स्लिप बनवण्यासाठी आकारण्यात येणारे 10 रुपये शुल्कही रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आता एम्समध्ये येणाऱ्या हजारो रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय आता 300 रुपयांपर्यंतच्या सर्व चाचण्याही मोफत असतील. आदेशानंतर एम्समध्ये रक्त तपासणी, एक्स-रे, अल्ट्रासाऊंड इत्यादी मोफत करण्यात आल्या.

रुग्णांना देण्यात येणार बँड
एम्समध्ये (एम्स) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बँड देण्यात येणार आहे. ज्यांचा नंबर येणार नाही, त्यांना किऑस्कद्वारे भेटीची वेळ दिली जाईल.