सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) प्रथमच सोशल मिडीयावर सक्रीय

सोशल मिडियापासून कायम अंतर राखून असलेली भारताची केंद्रीय तपास यंत्रणा सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सक्रीय झाली आहे. युजर आयडी सीबीआय- सीईओ सह दोन प्लॅटफॉर्मवर आपले अकौंट उघडले आहे. ईडी आणि एनआयए पूर्वीपासून सोशल मिडीयावर आहेत मात्र सीबीआय सोशल मिडिया पासून आत्ता पर्यंत दूर राहिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या १८ ऑक्टोबर पासून देशात तीन दिवसांची इंटरपोल महासभा होणार आहे. यंदा भारत या महासभेचा यजमान आहे. या महासभेत जगातील १९५ देश सामील होतील अशी अपेक्षा आहे. यंदा या सभेत सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, बालयौन शोषण सामग्री याविषयी चर्चा होणार आहे.

भारतात २५ वर्षानंतर इंटरपोल महासभेचे आयोजन केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात इंटरपोल महासचिव जुर्गन स्टॉक यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर स्टॉक यांनी भारत दौरा करून शहा यांची भेट घेतली होती. यापूर्वी १९९७ मध्ये भारतात या महासभेचे आयोजन झाले होते. इंटरपोल महासभा ही आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोलची सर्वोच्च संस्था असून त्याचे १९५ देश सदस्य आहेत. दरवर्षी यांची ही परिषद होते. यातील बहुतेक प्रतिनिधी मंत्री, पोलीस प्रमुख, सीबीआय प्रमुख व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असतात.