मोदींच्या भेटवस्तू लिलावात कंगनाची बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा ई लिलाव सध्या सुरु असून त्यात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दोन वस्तूंसाठी बोली लावली आहे. या ई लिलावाची मुदत वाढवून १२ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे. कंगनाने या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहेत. त्यात आपली दिनचर्या आणि लिलावाशी संबंधित माहिती देताना ती म्हणते,’ पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू, स्मृती चिन्हे लिलावात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. रामजन्म भूमी येथील माती आणि राममंदिरचे डिझाईन यासाठी मी बोली लावली आहे. या लिलावातून मिळणारा सर्व पैसा ‘ नमामि गंगे’ कार्यासाठी वापरला जाणार आहे. तुम्ही काय करता आहात? सहभागी व्हा.’

यावेळी पत्रकारांनी कंगना हिला राजकारण प्रवेशाविषयी काही प्रश्न विचारले तेव्हा कंगना म्हणाली,’ राजकारणात येण्याचा सध्या तरी विचार नाही. मी अभिनेत्री आहे आणि अभिनेत्री म्हणूनच काम करणार आहे. सर्वसामान्य माणसाइतकाच मला राजकारणात रस आहे. आमचे काम चित्रपटाच्या माध्यमातून राजकारणावर कसदार चित्रपट बनविणे आहे आहे.

या लिलावात मोदींना भेट मिळालेल्या अनेक महागड्या वस्तू सामील असून त्यात पेंटिंग्ज, मूर्ती, काही खास कलाकृती आहेत. यात सर्वात महाग वस्तू काशी विश्वनाथधामचे मॉडेल असल्याचे समजते.