डॉलर नव्हे, हे आहे जगातील सर्वात ताकदवान चलन

जगातील बहुतेक चलनांची म्हणजे करन्सीची तुलना अमेरिकी डॉलर बरोबर केली जाते. भारतीय रुपया डॉलर्स तुलनेत घसरला किंवा सावरला अश्या बातम्या आपण नेहमी वाचतो. कुठल्याही देशाच्या चलनाची जेव्हा घसरण होते तेव्हा त्या त्या देशांचे नुकसान होत असते. जगातील सर्वात ताकदवान चलन मात्र अमेरिकी डॉलर नसून ते आहे कुवेतचा दिनार.भारतीय रुपयाशी तुलना करायची तर एक कुवेती दिनारची किंमत २६३.४१ रुपये आहे तर डॉलरचा दर एक डॉलरला ८१.६४ रुपये आहे. कुवेती दिनार इतका ताकदवान असण्याचे कारण आहे तेथील खनिज तेल भांडार.जगभरात येथून तेलाची निर्यात होते आणि त्यामुळे त्यांचे चलन अधिक किंमत असलेले आहे.

या संदर्भातील एक विशेष गोष्ट अनेकांना माहिती नसेल. ७०-८० वर्षापूर्वी एक काळ असा होता, जेव्हा भारत सरकार कुवेतचे चलन पुरवत होते. रिझर्व्ह बँक कुवेतची करन्सी बनवत असे. त्याचे नाव होते गल्फ रुपी. हे चलन दिसायला रुपया सारखेच होते. त्याची खासियत म्हणजे हा गल्फ रुपी भारतात वापरता येत नसे.

१९६१ मध्ये कुवेत ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाले आणि १९६३ मध्ये ते अरब राष्ट्र बनले. तेथे सरकार निवडले गेले. त्यानंतर कुवेत सरकारने प्रथम त्यांची करन्सी जगासमोर आणली. त्यावेळी दिनारची किंमत १३ रूपये होती. १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कुवेती दिनारचा विनिमय दर (एकस्चेंज रेट) निश्चित झाला आजही हा फिक्स आहे.