उत्तर प्रदेशात आणखी काही वर्षात उपवर मुलांना मिळणार नाहीत नवऱ्या

आज नवरात्रातील अष्टमीची तिथी असून या दिवशी कन्यापूजन केले जाते. पण एकीकडे कन्यापूजन होत असले तरी दुसरीकडे मुलींची अवस्था अतिशय वाईट आहे. १९७० च्या दशकापासून गर्भलिंग चाचणी सुविधा सुरु झाल्यापासून गर्भात मुलगी असेल तर गर्भपात करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे मुली आणि मुलगे यांचे प्रमाण व्यस्त बनले आहे. पूर्वी पंजाब, हरियाना आणि राजस्थान ही राज्ये मुलगी जन्माला आली कि लगोलग तिला मारून टाकण्यासाठी प्रसिद्ध होती. गेल्या काही वर्षात या राज्यात थोडी सुधारणा झाल्याचे दिसत असून येथे मुली आणि मुलांचे जन्म प्रमाण योग्य पातळीवर येत आहे. मात्र आत्ता पर्यत फारसे लक्ष न गेलेल्या उत्तर प्रदेशात मुलीना जन्माला येण्याअगोदरच मारून टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

आकडेवारी नुसार १९७० ते २०२० या काळात जगभरात १४.२६ कोटी गर्भपात केले गेले त्यातील ४.६ कोटी भारतात तर ७.२ कोटी चीन मध्ये झाले होते. यातील बहुतेक सर्व मुली होत्या. नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार उत्तर प्रदेश या सर्वाधिक लोकसंखेच्या राज्यात २०३० पर्यंत २० लाख मुली गर्भात असतानाच मारल्या जातील. उत्तर प्रदेशात २०१२ मध्येच १० टक्के पुरुष लग्नासाठी मुली नाहीत म्हणून कुवारे राहिले होते आणि २०५० पर्यंत ही संख्या १७ टक्क्यांवर जाईल. वास्तविक या राज्यात गर्भलिंग चाचणीवर बंदी आहे. तरी आरोग्य सेवकच अश्या कृत्यात सामील आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस येथे मुलांच्या तुलनेत जन्माला येणाऱ्या मुलीचे प्रमाण घटत आहे. १९८० पासूनच येथे शेजारी नेपाळ, बांग्ला देश आणि अन्य राज्यातील मुली विवाह करून आणल्या जात आहेत. भविष्यात ही संख्या अधिक वाढेल आणि २०५० पर्यंत विवाह होऊ न शकलेल्या पुरुषांचे प्रमाण लक्षणीय असेल.

या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्यात मात्र मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत जास्त आहे ही अतिशय समाधानाची बाब मानली जात आहे. केवळ भारतातच नाही तर चीन आणि अन्य आशियाई देश किंवा जगातील अन्य काही देशात जेथे मुलगा जन्माला घालणे हेच महत्वाचे आहे तेथेही मुलींची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे.