इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यूतांडव, स्टेडियममधील चाहते अनियंत्रित – 150 हून अधिक लोक ठार, शेकडो जखमी


बाली : इंडोनेशियामध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान एक भयानक दृश्य पाहायला मिळाले. येथे दोन फुटबॉल संघांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर हा संघर्ष एवढा हिंसक झाला की, यात आतापर्यंत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खरे तर चाहते एकमेकांना भिडल्यानंतर इंडोनेशियातील पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, मात्र त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. संतप्त चाहत्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. या घटनेत शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत.

कसा सुरू झाला वाद
हा फुटबॉल सामना इंडोनेशियातील एका मोठ्या स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया क्लब यांच्यात खेळला जात होता. संपूर्ण स्टेडियम दोन्ही संघांच्या समर्थकांनी खचाखच भरले होते, मात्र त्यानंतर एक संघ हरला आणि दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. हे भांडण पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये लोक एकमेकांना भिडले. परिस्थिती अशी होती की तिथे उपस्थित सुरक्षा दलांना कसा तरी जीव वाचवावा लागला. दंगल वाढत असल्याचे पाहून इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कसेबसे लष्कराच्या जवानांनी दंगल करणाऱ्या जमावाला स्टेडियमबाहेर काढले. स्टेडियममधून बाहेर पडल्यानंतरही हिंसाचार झाला.

या भीषण अपघातानंतर आता इंडोनेशियामध्ये सुरू असलेली BRI Liga 1 लीग पुढील 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. पूर्व जावा येथील कांजुरहान स्टेडियमवर हा सामना सुरू होता. दंगल रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.