मल्लिकार्जुन खर्गे यांचा पदाचा राजीनामा, अध्यक्षपदाच्या उमेदवारीनंतर घेतला निर्णय


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर खर्गे म्हणाले की, काँग्रेसच्या एका नेत्याच्या एका पदाच्या नियमानुसार आपण हे पाऊल उचलले आहे. खर्गे यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षात कोणत्याही व्यक्तीला दोन पदे भूषवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजेच कोणत्याही नेत्याला दुसऱ्या पदापूर्वी त्याच्या सध्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

खर्गे होऊ शकतात काँग्रेसचे पुढील अध्यक्ष
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. खर्गे यांनी 30 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला, त्यानंतर आता 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. खर्गे हे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात उभे आहेत. खर्गे यांच्यामागे गांधी घराण्याचा हात असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामुळेच त्यांचा विजय होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत 30 प्रस्तावक उपस्थित होते.