Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढणार खर्गे आणि थरूर, केएन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोनच उमेदवार असतील. केएन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. आज दोनच उमेदवार आमनेसामने आहेत, बाकीचे चित्र 8 तारखेनंतर स्पष्ट होईल. कोणीही नाव मागे न घेतल्यास निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.

4 उमेदवारी अर्ज फेटाळले
मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, शुक्रवारी एकूण 20 फॉर्म जमा झाले. यापैकी छाननी समितीने स्वाक्षरीची अडचण आल्याने 4 अर्ज नाकारले. के.एन.त्रिपाठी यांचा फॉर्म विहित निकषांची पूर्तता न केल्यामुळे, त्याचबरोबर त्यावर स्वाक्षरीचा मुद्दा होता म्हणून नाकारण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाचे सध्याचे दोन दावेदार आहेत.

अध्यक्षपदाच्या शर्यतीतून दिग्विजय सिंह यांनी घेतली माघार
मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचीही नावे काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. राजस्थान काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.