T20 WC : वर्षभरापूर्वी शोएब अख्तरने बुमराहबाबत केली होती ही भविष्यवाणी, आता भारतीय वेगवान गोलंदाज पडला त्याचा बळी


टी-20 विश्वचषक स्पर्धेला अवघे काही आठवडे उरले आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या त्रासामुळे टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. या वर्षी केवळ 15 सामने खेळलेल्या बुमराहच्या बाहेर पडल्याने भारताच्या विश्वचषकातील आशांना मोठा धक्का बसला आहे. बुमराहने यावर्षी पाच कसोटी, पाच वनडे आणि पाच टी-20 सामने खेळले आहेत. आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर, बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T-20I मालिकेत पुनरागमन केले आणि दोन सामने खेळल्यानंतर त्याच्या पाठीला फ्रॅक्चर झाले.

बुमराहने भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यासाठी तिरुअनंतपुरम येथे प्रवास केला, परंतु सराव सत्रादरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे तो खेळू शकला नाही. BCCI ने अद्याप बुमराहच्या दुखापतीबद्दल किंवा T20 विश्वचषकासाठी त्याच्या बदलीबद्दल अपडेट दिलेले नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद सिराजला निश्चितपणे संघात बोलावण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. शमी नुकताच कोविड-19 मधून बरा झाला आहे आणि T20 विश्वचषकासाठी चार स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. भारताच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या योजनेत नसलेल्या सिराजला त्याच्या अलीकडील कामगिरीच्या आधारे संघात समाविष्ट केले जाऊ शकते. इंग्लंडमध्ये वॉरविकशायरकडून खेळताना सिराजने शानदार गोलंदाजी केली.

दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे सारखेच गोलंदाज असल्याने ते सध्या या शर्यतीत कमकुवत मानले जात आहेत. बुमराहच्या दुखापतीची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यापैकी एक शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज बुमराहची अनोखी गोलंदाजी त्याच्या कारकिर्दीला कशी धोका निर्माण करू शकते याबद्दल सांगत आहे.

सुमारे एक वर्षापूर्वी एका टीव्ही चॅनलशी बोलताना शोएब म्हणाला होता – बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर आधारित आहे. चेंडू फेकताना तो वेग निर्माण करण्यासाठी त्याच्या पाठीचा आणि खांद्याचा वापर करतो. आम्ही गोलंदाजी करताना साइड-ऑन असायचो आणि त्यामुळे पाठीवर जास्त दडपण येत नाही. बुमराहची फ्रंट-ऑन अॅक्शन दबाव कमी करू शकत नाही. जेव्हा तुमची पाठ अशा प्रकारच्या बॉलिंग अॅक्शनला प्रतिसाद देते, तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही त्यातून सुटू शकत नाही.

रावळपिंडी एक्सप्रेसने वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांचे उदाहरण देत म्हटले की, भारत बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. अख्तर म्हणाला- मी पाहिले की बिशप त्याच्या पाठीशी झुंजत होता, शेन बॉन्डची देखील अशीच परिस्थिती होती आणि दोघांचीही फ्रंटल अॅक्शन होती. बुमराहने आता असा विचार केला पाहिजे की मी एक सामना खेळलो आणि विश्रांती घेतली आणि पुनर्वसनासाठी गेलो. त्याला व्यवस्थापनाची गरज आहे. जर तुम्ही त्याला प्रत्येक सामन्यात संधी दिली, तर एका वर्षात तो पूर्णपणे तुटून जाईल. त्याला पाच पैकी तीन सामने द्या आणि मग त्याला विश्रांती द्या. बुमराहला लांब खेळायचे असेल, तर ही एक गोष्ट सांभाळावी लागेल.

चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत आणि बुमराहच्या दुखापतीचा अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल चाहत्यांनी अख्तरचे कौतुक केले. विशेष म्हणजे अख्तर हा एकमेव माजी वेगवान गोलंदाज नव्हता, ज्याने बुमराहच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ कारकिर्दीवर शंका व्यक्त केली होती. वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनेही सांगितले होते की, बुमराह ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याला नेहमीच दुखापतीचा धोका असतो.