हापूर हल्ल्यातील आरोपींच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ओवेसींच्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकारला नोटीस


नवी दिल्ली : हापूरमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना जामीन देण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. ओवेसी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

ओवेसी यांनी याचिकेत म्हटले आहे की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातील आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांनी जामीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाने आज या प्रकरणी नोटीस बजावली आहे की हे प्रकरण पुनर्विचारासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवायचे की नाही. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हापूर टोल प्लाझाजवळ शुभम आणि सचिन या दोन आरोपींनी ओवेसी आणि त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ओवेसी थोडक्यात बचावले. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही वेळातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. सुटका झाल्यानंतर आरोपी शुभम आणि सचिन जेव्हा त्यांच्या गावी पोहोचले, तेव्हा तेथे हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचे स्वागत केले.