किंग चार्ल्स थर्ड चे नवे नाणे आले

ब्रिटनच्या रॉयल मिंटने नवा राजा किंग चार्ल्स थर्ड यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा फोटो शेअर केला आहे. आजपर्यंत गेली ७० वर्षे महाराणी एलिझाबेथ यांच्या प्रतिमा असलेली नाणी आणि नोटा चलनात वापरल्या जात आहेत. आता नव्या राजांची प्रतिमा असलेली नाणी वापरात येतील आणि येत्या नाताळ पासून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होतील असे समजते. मूर्तिकार मार्टिन जेनिंग्ज यांनी ही नवी नाणी तयार केली आहेत. सध्या ५ पौंड आणि ५० पेन्स अशी दोन नाणी फोटो मध्ये दिसत आहेत.

या प्रतिमेतील राजा उजवीकडून डावीकडे पाहणारा आहे. राणी एलिझाबेथची प्रतिमा असलेल्या नाण्यात राणी डावीकडून उजवीकडे पाहणारी आहे. म्हणजे राणीच्या बरोबर विरुध्द दिशेला राजाचे तोंड आहे पण १७ व्या शतकापासून अशीच ब्रिटीश परंपरा आहे. पहिल्या नाण्यात ज्या बाजूला राजा किंवा राणीचे तोंड असेल त्याच्या वारसाचे नवे नाणे काढताना ते विरुद्ध बाजूला वळविले जाते. नाणी किमान २० वर्षे टिकतात. राणीची प्रतिमा असलेली २७ अब्ज नाणी सध्या चलनात आहेत. ती चलनात राहतील. नव्या नाण्याचा खर्च करदात्यांच्या पैशातून केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे नागरीकाना या नव्या नाण्यांच्या खर्चाचा बोजा उचलावा लागणार नाही.

या विषयी अधिक खुलासा करताना असे म्हटले गेले आहे कि, जुन्या नोटा किंवा खराब नाणी बदलून त्या जागी नवे चलन आणले जाते. शिवाय आजकाल कार्ड, मोबाईल पेमेंट मुळे रोख रकमेचा वापर कमी झाला आहे आणि भविष्यात तो आणखी कमी होणार आहे. त्यामुळे नोटा सध्या तरी बदलल्या जाणार नाहीत.