मुकेश अंबानी यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांची सुरक्षा वाढविली आहे. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आयबी कडून आलेल्या शिफारसीनुसार मुकेश यांना झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे. आयबीने मुकेश यांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत मिळाल्याचा रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी मुकेश यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. आता झेड प्लस सुरक्षेत त्यांना सीआरपीएफचे ५८ कमांडो चोवीस तास सुरक्षा देणार आहेत.

गतवर्षी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेले एक संशयित वाहन सापडले होते. तसेच त्यांना अनेकदा धमकीचे फोन आले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत केंद्र विचार करत होते. नव्या सुरक्षेच्या खर्च मुकेश अंबानी करणार असून त्यांना त्यासाठी महिना ४० ते ४५लाख रुपये खर्च येणार असल्याचे समजते. या सुरक्षेतील जवानांच्या कडे जर्मन हेक्बर अँड कोच एमपी ५ सब मशीनगन असतील. यातून एका मिनिटात ८०० गोळ्या फायर करता येतात. झेड प्लस ही भारतात व्हीव्हीआयपी, सर्वात हाय लेव्हल सुरक्षा आहे. त्यात सहा सेन्ट्रल सिक्युरिटी लेव्हल आहेत.

मुकेश अंबानी आणि परिवाराला अगोदर पासून सुरक्षा आहेच शिवाय त्यांचे खासगी १५ ते २० सुरक्षा रक्षक आहेत. या रक्षकांकडे शस्त्रे नाहीत. त्यांना इस्रायल मधून प्रशिक्षण दिले गेले आहे. मार्शल आर्ट मध्ये हे जवान तयार असून सध्या दोन शिफ्ट मध्ये ते अंबानी यांच्या सेवेत आहेत. यात सेनेतील निवृत्त व एनएसजी कमांडो सुद्धा आहेत. मुकेश यांच्या घराभोवती कडक सुरक्षा असून सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाली खाली आहे.