कुनो अभयारण्यातील चित्त्यांसाठी नावे सुचवा- चित्ते दर्शनाचे बक्षीस मिळवा

मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात नामिबिया येथून आणले गेलेले आठ चित्ते सोडले गेले आहेत. भारतात ७० वर्षानंतर पुन्हा एकदा चित्ते आल्यामुळे लोकांमध्ये या चित्यांना पाहण्याची मोठी उत्सुकता आहे. पण चित्ते नव्या जागी पूर्ण रुळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात ही संधी लवकर हवी असेल तर एका स्पर्धेत भाग घेवून त्यात हे बक्षीस मिळवावे लागेल.

सरकारने या साठी एकूण तीन स्पर्धा ठेवल्या आहेत. mygov. in या लिंकवर जाऊन क्लिक केल्यास स्पर्धेची माहिती आणि नाव नोंदणी करता येणार आहे. आत्ता पर्यंत सुमारे ७५० लोकांनी नोंदणी केली असून शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२२ अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत भाग घेणाऱ्यानी आपल्या पाहुण्या चित्त्यांसाठी नावे सुचवायची आहेत. दुसऱ्या स्पर्धेत या चित्ता प्रोजेक्ट साठी नाव सुचवायचे आहे तर तिसऱ्या स्पर्धेत प्राण्याशी चांगले वर्तन आणि त्याचे महत्व या विषयी लिहायचे आहे.

निसर्ग आणि प्राणी हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच प्राण्यांशी चांगले वर्तन याला आपल्याकडे विशेष महत्व आहे. चित्ते हा सुद्धा पर्यावरणाचा एक महत्वाचा दुवा आहेत आणि नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा देशात आणण्याचा निर्णय, म्हणूनच ऐतिहासिक मानला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी २५ सप्टेंबर २०२२ रोजी या स्पर्धेची कल्पना मांडून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते.