टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराह T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर


नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्व चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुमराहच्या पाठीची दुखापत खूप गंभीर असून तो पुढील 4 ते 6 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. मात्र, बीसीसीआयने अद्याप बुमराहच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पाठदुखीमुळे बुमराह टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. जसप्रीत बुमराहला पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मात्र जसप्रीत बुमराह 4 ते 6 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वास्तविक, जसप्रीत बुमराहला इंग्लंड दौऱ्यानंतरच दुखापत झाली होती. यानंतर जसप्रीत बुमराह आशिया चषकाचा भागही होऊ शकला नाही आणि यादरम्यान त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बुमराह टीम इंडियात परतला. मात्र मालिकेतील दोन सामने खेळल्यानंतरच बुमराहला पुन्हा दुखापत झाली.

नंबर वन गोलंदाज आहे बुमराह
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यापूर्वी बुमराह दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर बीसीसीआयकडून बुमराहबाबत फिटनेस अपडेट जारी करण्यात आले. सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास झाल्याचे या अपडेटमध्ये समोर आले आहे.

बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या शक्यतांनाही मोठा धक्का बसला आहे. बुमराह हा या फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर वन गोलंदाज आहे आणि त्याचा बदली खेळाडू शोधणे बीसीसीआयसाठी सोपे जाणार नाही.