सौदीचे पंतप्रधान बनले क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान

सौदी अरेबिया मध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. सौदीचे शासक किंग सलमान बिन अब्दुल अजीज यांनी मंगळवारी शाही फर्मान काढून त्यांचा मुलगा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा दुसरा मुलगा प्रिन्स खालिद यांच्याकडे संरक्षण मंत्रालय सोपविले गेले आहे तर तिसरा मुलगा प्रिन्स अब्दुल अजीज बिन सलमान यांच्याकडे उर्जा मंत्रालय दिले गेले आहे. विदेश मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याकडे होता तोच कार्यभार ठेवला गेला आहे. अर्थमंत्री पदावर मोहम्मद अल जायान, गुंतवणूक मंत्री कालिद अल फालोह यांच्याकडे पूर्वीच्याच जबाबदाऱ्या आहेत.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना एमबीएस या नावाने सुद्धा ओळखले जाते. पूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले असून त्यांच्याकडेच सौदीचा खरा शासक म्हणून पाहिले जाते. आपल्या निवेदनात त्यांनी सौदीला सैन्य उद्योगात आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. सध्या हा वेग १५ टक्के असून तो लवकरच ५० टक्क्यांवर नेला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ८६ वर्षीय किंग सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यासोबत क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी अडीच वर्षे एकत्र काम केले आहे. क्राऊन प्रिन्स म्हणून त्यांनी २०१७ मध्ये सत्ता घेतली तेव्हापासून सौदी मध्ये अनेक बदल झाले आहेत. महिलांना वाहन चालक परवाने, तेलावर निर्भरता कमी करण्याचे प्रयत्न, मौलवी अधिकारांवर अंकुश असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत.