लेफ्ट. जनरल (निवृत्त) अनिल चौहान नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

केंद्र सरकारने जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर लेफ्ट.जनरल, निवृत्त अनिल चौहान यांची नवे सीडीएस म्हणून नियुक्ती केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. चौहान यांना दहशतवाद विरोधी कारवायांच्या प्रचंड मोठा अनुभव असून ते त्यांचे खास कौशल्य मानले जाते. चौहान देशाचे दुसरे सीडीएस बनले आहेत त्याचबरोबर ते संरक्षण मंत्रालय सैन्य विषयाचे सचिव म्हणून सुद्धा काम पाहणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने अनिल चौहान यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

लेफ्ट.जनरल चौहान यांनी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अजित डोवल यांच्याबरोबर लष्कर सल्लागार म्हणून काम केले आहे. ४० वर्षे त्यांनी लष्करात सेवा दिली आहे. अनेक कमांड, स्टाफ आणि महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले असून दहशतवादी विरोधातील त्यांची अभियाने चर्चेत राहिली आहेत. बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जम्मू, ईशान्येकडील राज्ये, येथील अभियानांचा त्यांचा अनुभव मोठा आहे.

१८ मे १९६१ ही अनिल चौधरी यांची जन्मतारीख. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी मधून आणि नंतर इंडियन मिलिटरी अकादमी मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर १९८१ मध्ये ते लष्कराच्या ११ गोरखा रायफल्स मध्ये सामील झाले होते. बारामुल्ला मध्ये त्यांनी मेजर जनरल म्हणून काम पहिले आणि नंतर ते लेफ्ट.जनरल बनले. २०१९ मध्ये ते पूर्व मुख्यालयात जनरल ऑफिस कमांडीग चीफ बनले आणि मे २०२१ मध्ये निवृत्त झाले. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट विशेष सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक मिळालेले आहे.