‘ जिओ’ चे आकाश अंबानी, टाईम १०० नेक्स्ट यादीत समाविष्ट

जगातील प्रतिष्ठित टाईम मासिकाच्या जगभरातील उदयोन्मुख व्यक्तीच्या यादीत म्हणजे टाईम नेक्स्ट १०० मध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि रिलायंस जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांचा समावेश झाला आहे. या यादीत सामील करण्यात आलेले ते एकमेव भारतीय आहेत.

आकाश यांच्या संदर्भात टाईम मासिकात असे म्हटले गेले आहे कि, आकाश अंबानी यांनी उद्योगाच्या वाढीसाठी कसून मेहनत केली आहे. गुगल आणि फेसबुकने केलेले अब्जावधीचे गुंतवणूक करार पूर्णत्वाला नेण्यात आकाश यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या २२ व्या वर्षीच ते जिओच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत. याच वर्षात जून मध्ये आकाश यांनी  जिओ या भारतातील सर्वात बड्या दूरसंचार कंपनीची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतात आज जिओचे ४२ कोटी ६० लाख ग्राहक असून दिवाळीपासून कंपनी देशात ५ जी सेवा सुरु करत आहे.

रिलायंस जिओ ही देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील अशी एकमेव कंपनी आहे जिने ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा असा स्पेक्ट्रम आहे, ज्यावर स्टँड अलोन ५ जी नेटवर्क चालू शकते. टाईमच्या २०२२ च्या १०० नेक्स्ट यादीत संगीतकार, चिकित्सक, सरकारी अधिकारी, आंदोलनकर्ते, हाय प्रोफाईल व्हिसल ब्लोअर्स, टॉप सीईओज यांचाही समावेश केला गेला आहे.